पिंपरीत हवालदाराला कोरोनाची लागण; चिंता वाढली : शहरात सात पोलीस झाले बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 07:24 PM2020-05-23T19:24:31+5:302020-05-23T19:26:27+5:30
शहरातील एका पोलीस ठाण्यात मजुरांचे हे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी संबंधित हवालदारावर होती.
पिंपरी : कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत भर पडतच आहे. उद्योगनगरीतील एका पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सात झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाबाधित पहिला पोलीस गेल्या आठवड्यात १५ मे रोजी आढळून आला होता. त्यानंतर १८ तारखेला एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी (दि. २०) एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे.
लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने मजूर अडकले होते. त्यांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी या मजुरांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात संकलित केले जात होते. शहरातील एका पोलीस ठाण्यात मजुरांचे हे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी संबंधित हवालदारावर होती. त्यामुळे या हवालदाराचा हजारो मजुरांशी थेट संपर्क आला. या हवालदाराच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहर पोलीस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या शनिवारी सातवर पोहचली. मात्र सहायक पोलीस निरीक्षकाच्या दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तसेच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
......................