Corona virus : पिंपरीत गुरुवारी कोरोना पॉझिटिव्हपेक्षा कोरोनामुक्त अधिक; ३३ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:23 AM2020-09-18T11:23:23+5:302020-09-18T11:24:03+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे.
पिंपरी : पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहरातील १८ आणि पुण्यातील १५ अशा एकुण ३३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गुरूवारी ५ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. ५ हजार १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १११३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, १ हजार १९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या सामाजिक संसर्गास सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात सर्वाधिक ही संख्या दिवसाला बाराशे रुग्ण अशी पोहोचली होती. ही संख्या आता कमी होऊ लागली आहे. दाखल पेक्षा डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे.
दिवसभरात ५ हजार ३८५ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ५ हजार १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ६७ हजार ५९६ वर पोहचली आहे. तर १ हजार ८१५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ५ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार १३१ झाली आहे.
...........................
१८१५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. १८१५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात १ हजार १९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५ हजार ५०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक
शहरातील १८ आणि पुण्यातील १५ अशा एकूण ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात महिला- पुरुष आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत १०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.