Corona virus 'कोरोनाचे' नाव आणि रुग्णालयांचा लुबाडणुकीचा 'डाव'; नातेवाईकांच्या अज्ञानाचा घेतला जातोय गैरफायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:16 PM2020-07-28T12:16:24+5:302020-07-28T12:21:27+5:30
नातेवाईकांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तसेच वैद्यकीय अज्ञानाचा फायदा उचलून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात आहे.
युगंधर ताजणे-
पिंपरी : एखाद्या रुग्णालयामध्ये प्रवेश केल्यानंतर संबंधित विभागात जाण्यासाठी करावी लागणारी विचारपूस, त्याला कर्मचा-यांकडून मिळणारा प्रतिसाद, रुग्णाचे महत्वाचे कागदपत्र नातेवाईकांकडून गहाळ झाल्यास त्यावरुन राईचा पर्वत करणे, औषधोपचाराविषयी रुग्णाला न सांगणे, रुग्णाला नेमके काय झाले आहे, त्याच्यावर कशापध्दतीने उपचार करणार आहोत याची माहिती न देणे आणि सध्या तर कोरोनाचे कारण पुढे उपचाराबाबत हेळसांड होत असल्याचे दिसून आले आहे.
औद्योगिक शहरात 50 पेक्षा जास्त मोठी रुग्णालये आहेत. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या सुचनांनुसार अनेक खासगी रुग्णालयांनी नियमावलीत बदल केला आहे. मात्र ती नियमावली रुग्णाच्या फायद्याची न ठरता त्याला त्रासदायक ठरताना दिसत आहे. रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तसेच त्यांना वैद्यकीय क्षेत्राबाबत असलेल्या अज्ञानाचा फायदा उचलून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. ती लुट उपचार आणि औषधांच्या दराबाबत आहे. तीन दिवसांपूर्वी एका बडया रुग्णालयात केवळ कोरोनाची चाचणी नसल्या कारणाने रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यु झाला होता. यासंबंधीचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. पहिल्यांदा उपचार नव्हे तर ‘डिपॉझिट’ ची मागणी रुग्णाच्या नातेवाईकाकडे केली जाते.
रु ग्णाला लागणारी औषधे आम्ही सांगु त्याच औषधविक्रेत्याकडून खरेदी करणे, त्या दुकानापर्यंत पोहचविण्यासाठी एक माणूस मदतीला असणे, इतर दुकानांपेक्षा संबंधित दुकानात ते औषध जास्त दरात विकत घ्यावे लागणे अशा त्रासाला नातेवाईकांना सामोरे जावे लागते. औषधांसाठी पुरेसे पैसे नसताना त्यासाठी थोडे थांबण्याची त्या दुकानदाराची तयारी नसते. विशेष म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध त्या परिसरातील इतर दुकानांमध्ये न मिळता ते त्याच रुग्णालयाच्या बाहेरील दुकानात मिळत असल्याने त्याबाबत शंका व्यक्त केली जाते.
टेस्ट आणि रिपोर्टशिवाय काही सांगता येणार नाही.
आता कोरोना आहे त्याच्या चाचण्या कराव्या लागणे समजु शकतो. मात्र इतर वेळी देखील साधे कुठेलेही दुखणे असले तरी रक्त, लघवी, मधुमेह यांची चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतातच. रुग्णाने आपल्याला मधुमेह आहे असे सांगूनही पुन्हा शुगर चेक करुन उपचार करावे लागतील अशी सुचना असते. रुग्ण सांगत असलेल्या माहितीच्या आधारे डॉक्टर काहीच सांगत नाहीत. टेस्टच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणा-या नाहीत. याचा विचारही डॉक्टरांनी करावा. - एक (रुग्ण)
पैसे देऊ पण माणुसकी दाखवा
कोरोनाच्या काळात खिशात पैसा राहिला नाही. आपला माणूस जगावा यासाठी नातेवाईक पैशांकडे पाहत नाहीत. त्यांना उपचार हवे असतात. सरकारी रुग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नाहीत म्हणून खासगी रुग्णालयात यावे लागते. येथे विचारपूस करतानाच दमछाक होते. रुग्णाला काय झाले आहे याची नेमकी माहिती डॉक्टरांनी द्यावी. पैशांसाठी अडवणूक करु नये असे वाटते. सगळेच रुग्ण फसवणारे नसतात. हे त्यांना सांगावेसे वाटते. - (एका रुग्णाचे नातेवाईक)