Corona Virus News : पिंपरी शहरात १२० नवे रुग्ण, ३९ जण कोरोनामुक्त; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:48 PM2021-02-13T19:48:38+5:302021-02-13T19:49:07+5:30
पिंपरी शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत..
पिंपरी : शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या आत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात शनिवारी दिवसभरात १२० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३९ जण कोरोनामुक्त झाले.
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ६१८ झाली आहे. शहरात शनिवारी महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७६९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात ११२६ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ८०३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ९१४ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १०४५ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६७७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १०७ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९७९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह १०८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात ११७४ रुग्णांचे गृहविलगीकरण
कोरोना पॉझिटिव्ह असलेले ६७७ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सक्रीय असलेल्या ११७४ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १८५१ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. शनिवारी दिवसभरात ३१५ घरांना भेटी देऊन १०८४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.