Corona Virus News : पुणे विभागातील २६ रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा नाही; केवळ १०७ बॅग शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 12:37 PM2021-03-03T12:37:12+5:302021-03-03T12:39:35+5:30
कोरोना वाढत असताना तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
तेजस टवलारकर -
पिंपरी-चिंचवड : पुणे विभागात ४२ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्यात येते. सद्य:स्थितीत या ४२ रक्तपेढ्यांमध्ये २०० एमएलच्या १०७ प्लाझ्मा बॅग शिल्लक आहेत. या ४२ रक्तपेढ्यांपैकी २६ रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. १६ रक्तपेढ्यांमध्ये केवळ १०७ बॅग प्लाझ्मा शिल्लक आहे. सोलापूरच्या रक्तपेढीत सर्वाधिक ३४ बॅग शिल्लक आहेत, तर कोल्हापूरच्या रक्तपेढीत २२ बॅग शिल्लक आहेत. बाकी सर्व रक्तपेढ्यांमध्ये एक ते पाच अशा बॅग उपलब्ध आहेत. फेब्रुवारीपासून अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने विभागात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. परिणामी प्लाझ्माची मागणी कमी झाली होती. प्लाझ्मादानही कमी झाले होते. परंतु, आता रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा प्लाझ्माच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मासाठी रक्तपेढ्यांमध्ये विचारणा करीत असल्याची स्थिती आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. या काळात प्लाझ्मा मिळणे कठीण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर प्लाझ्मादान वाढले होते.
कोरोनाची मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात येते. कोरोनावर अद्यापही औषध उपलब्ध नाही, त्यामुळे गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज लागते. वयोवृद्ध रुग्णांना बरे होण्यासाठी सर्वाधिक प्लाझ्माची आवश्यकता लागते. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतात.
---
आतापर्यंत ४३७८ दात्यांनी केले दान
पुणे विभागात २५ फेब्रुवारीपर्यंत ४३७८ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. त्यातून २०० एमएलच्या ८९०१ प्लाझ्मा बॅग तयार करण्यात आल्या आहेत. यातील २०० एमएलच्या ८७५१ बॅगचे वितरण करण्यात आले आहे. वितरण केलेल्यांपैकी ४३ बॅग या निरुपयोगी ठरल्या आहेत