Corona Virus News : पिंपरी-चिंचवड महापालिकेची हेल्पलाइन नव्हे ‘लूटलाइन’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:12 PM2020-09-30T17:12:46+5:302020-09-30T17:18:08+5:30
महापालिका प्रशासनाच्या या कारभाराबाबत शहरवासीयांकडून संताप व्यक्त..
नारायण बडगुजर-
पिंपरी : शहरातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड मोठ्या संख्येने उपलब्ध असूनही त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरून माहिती दिली जात नाही. खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असून तुम्ही तुमच्या रुग्णाला तिकडे दाखल करू शकता, असा सल्ला हेल्पलाइनवरून दिला जातो. यातून दिशाभूल करून रुग्णांची लूट करण्याचा प्रकार होत असून, महापालिका प्रशासनाच्या या कारभाराबाबत शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य शासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच महापालिकेने चिंचवड येथील आटो क्लस्टर येथे देखील कोविड सेंटर उभारले आहे. यात जम्बो सेंटरमध्ये ६०० तर आटो क्लस्टर येथे १५० असे दोन्ही सेंटरमुळे ऑक्सिजनचे सुमारे साडेसातशेवर बेड उपलब्ध झाले आहेत. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने यातील ५० टक्क्यांवर बेड रिकामे आहेत.
महापालिका रुग्णालय, कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत, याबाबत नागरिकांना सहज माहिती मिळावी यासाठी डॅशबोर्डवर बेडची संख्या दर्शवण्यात येत आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर ऑक्सिजन बेडबाबत चौकशी केली असता, खासगी रुग्णालयांच्या नावाची शिफारस केली जाते.
हेल्पलाइन नेमकी कोणासाठी..?
महापालिकेने उपलब्ध करून दिलेली हेल्पलाइन बेडबाबत माहिती मिळण्यासाठी आहे की, खासगी रुग्णालयांच्या ब्रँडिंगसाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुमारे ४० किंवा त्यापेक्षा जास्त खासगी रुग्णालयांची माहिती हेल्पलाइनवरून दिली जाते. मात्र महापालिकेच्या एकाही रुग्णालय किंवा कोविड सेंटरमधील बेडच्या उपलब्धतेबाबत या हेल्पलाइनवरून माहिती दिली जात नाही. खासगी रुग्णालयांच्या लॉबीची मर्जी सांभाळण्यासाठी हेल्पलाइनचा उपक्रम राबविण्यात येत आहे का, यात प्रशासनातील कोणाचे लागेबांधे आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हेल्पलाइन क्रमांकावरील संवाद
- हॅलो, मोशी येथून बोलतोय, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत का...
हेल्पलाइन : मोशी परिसरात काही चांगले खासगी रुग्णालय आहेत. तेथे बेड आहेत.
- खासगी नको, महापालिका रुग्णालयातील बेडबाबत सांगा...
हेल्पलाइन – महापालिका रुग्णालयांमध्ये बेड फुल्ल आहेत. खासगीत लगेच सोय होईल. काही खासगी हॉस्पिटलची नावे सांगू का...
- नाही, जम्बो कोविड सेंटरमध्ये आहेत ना बेङ...
हेल्पलाइन – हो, पण ते दुपारच्या रिपोर्टनुसार होते. आता फुल्ल झाले असेल. माहिती घ्यावी लागेल. नाहीतर तुमच्या पेशंटला वायसीएमला घेऊन जा, तेथून व्यवस्था होऊ शकते का ते पहा...
- त्यात पेशंटचे हाल होतील. ॲम्बुलन्समध्ये कितीवेळ फिरवणार पेशंटला. वायसीएममध्ये तुम्हीच विचारून सांगता का...
हेल्पलाइन – मग खासगी रुग्णालयात दाखल करायला काय अडचण आहे, लगेच नावे सांगतो. नाहीतर वायसीएमचा नंबर देतो, तेथे तुम्हीच चौकशी करा...