Corona virus : नऊ हजारांहून अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त पण, प्लाझ्मा दानासाठी कुणी पुढे येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:23 AM2020-07-25T11:23:20+5:302020-07-25T11:27:21+5:30
कोरोनाच्या विळख्यातून आत्तापर्यंत ९ हजाराहून अधिक रुग्ण बाहेर आले आहेत.
पिंपरी : शहरात नऊ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. मात्र यापैकी प्लाझ्मा देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत केवळ 38 जणांनी प्लाझ्मा दान केले असून त्याचा फायदा 35 अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना झाला आहे. प्लाझ्मा दानाविषयी अद्याप रुग्णांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील कमालीची भीती व अज्ञान असल्याने ते स्वयंस्फुर्तीने प्लाझ्मा दान करत नसल्याचे दिसून आले आहे.
सध्या प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करता येत नाही. बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणा-या गैरसमजामुळे ते प्लाझ्मा देण्यास नकार देत असल्याने प्लाझ्मा कमतरता जाणवत आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जातो. रुग्णाच्या शरिरातील अॅण्टीबॉडी तसेच विषाणूंबरोबर लढा देण्याचे काम प्लाझ्मा करते. त्यानंतर अत्यवस्थ किंवा गरज असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या शरिरात हा प्लाझ्मा सोडला जातो. प्लाझ्माच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात कोरोनाच्या विषाणुबरोबर लढणा-या पेशी तयार होतात. त्यामुळे रुग्ण लवकर यातून बरा होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ३५ कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. ते उपचार केलेले ३५ रुग्ण बरे झाले आहेत.
नागरिकांच्या मनातील भीती
- प्लास्मा दिल्यावर पुन्हा कोरोना होण्याची भीती
- रोगप्रतिकारक शक्ती संपून जाईल
- अशक्तपणा येईल
- रक्तातील सर्व पेशी काढून घेतील
रुग्णांमध्ये प्लाझ्माविषयी विनाकारण भीती व अज्ञान आहे. त्याविषयी त्यांच्यात जागरुकतेची गरज आहे. अनेकजण प्लास्मा देण्यास घाबरत आहेत. प्लाज्मा दान केल्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीला कोणतीही हानी पोहचत नाही. या उलट प्लाझ्मा दान केल्याने आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता नागरिकांनी प्लाज्मा दानास पुढे येण्याची गरज असल्याने प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढल्यास त्याचा फायदा अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना होणार आहे. - डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी