Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:50 PM2020-08-31T20:50:38+5:302020-08-31T20:54:36+5:30
पिंपरीत आजपर्यंत एकूण ३६७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असला तरी, सोमवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीने रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात ५९३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १०३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९,३३० झाली. सोमवारी दिवसभरात महापालिका हद्दीबाहेरील पाच नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३,२१५ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३,२३५ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात सोमवारी दिवसभरात १३ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील एक जणाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८६६ तर महापालिका हद्दीबाहेरील १८६ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच २,५१५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३,६६६ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५,४५६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ९३० रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १,९१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३४,८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २५३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.
शहरात सोमवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये मोशी येथील ६५ वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ६५ वर्षीय महिला, चिखली येथील ६३ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, थेरगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, भोसरी येथील ६४ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, रहाटणी येथील ६३ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, रावेत येथील ३३ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, खेड येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
शहरातील रुग्णसंख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर
शहरात आजपर्यंत १,८३,३५७ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. तसेच आजपर्यंत १,७०,७८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १,३१,५१२ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ३६७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत ४९,३३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर असून, त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.