Corona virus Pimpri : पिंपरीतील ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद; महापालिका प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:43 PM2021-06-01T21:43:46+5:302021-06-01T21:45:32+5:30
कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व सोयींनी सुसज्ज अशी यंत्रणा ऑटो क्लस्टरमध्ये उभारली आहे.
पिंपरी : शहरातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णालयात दाखल होणाठया बाधित रुग्णांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. आजमितीला ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद केल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व सोयींनी सुसज्ज अशी यंत्रणा ऑटो क्लस्टरमध्ये उभारली आहे. शहरात फेब्रुवारी २१ पासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. दिवसाची रुग्णसंख्या तीन हजारापर्यंत गेली होती. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. रुग्णालयात दाखल होणाठया बाधित रुग्णांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही.महापालिकेने ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय आजपासून बंद केले आहे. रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) या पूर्वीच बंद केले आहेत. तर, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे १०० रुग्ण उपचार घेत असून नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद केले आहे. १० तारखेपर्यंत बंद जम्बो सेंटर बंद होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
गरज सरो वैद्य मरो, महापालिकेचे काम
ऑटो क्लस्टरमधील डॉक्टर परिचारिकांना केले कमी
पिंपरी : कोरोनाच्या कालखंडात नागरिकांना जीवदान देण्याचे काम करणाऱ्या ऑटो क्लस्टरमधील डॉक्टर आणि परिचारिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो असा कारभार महापालिकेचा असल्याची टीका होत असून कोरोनायोद्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर येथे कोविड रुग्णालय सुरू केले होते. हे रूग्णालय स्पर्श हॉस्पिटलला चालविण्यास दिले होते. मात्र, रुग्णालयाविषयी तक्रारी आल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श या खासगी संस्थेचे ९ मे रोजी अधिग्रहित केले होते. डॉक्टर आणि परिचारिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची शाश्वती महापालिकेने दिली होती. तसेच महिनाभरापूर्वी रुग्णालयात कार्यरत असलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील आदेशापर्यंत कार्यालयीन कामकाज करण्याबाबत रुग्णालयात कार्यरत रहावे, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले होते.
मात्र, कोरोनाचा आलेख कमी होताच सोमवारी महापालिकेने कोणतीही पूर्व सूचना ने देता रुग्णालय बंद केल्याने कोरोनायोद्धे रस्त्यावर आले आहेत. मंगळवार सकाळपासून कामगार ठिय्या मांडून आहेत. घोषणाबाजी करीत असून मदतीची याचना करीत आहेत.
.................
कामगारांनी दिले आयुक्तांना निवेदन
कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकणे अन्यायकारक आहे. गेल्या दोन महिन्यांचे वेतन दिले नसून ते कधी देणार? जोपर्यंत आम्हाला कामावर घेणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार? येत्या चोविस तासांच्या आत प्रश्न सोडवावा, काम मिळत नाही तोपर्यंत आम्हाला दुसरीकडे नियुक्ती द्यावी, अशी मागणी करणारे पत्र कोरोना योद्यांनी महापालिकेला दिले आहे. त्यावर डॉ. मयूरी साठे, श्रृती पाटील, सोनल विसपुते, सुनिता वाघमोरे यांच्या स्वाक्षºया आहेत.