Corona virus : पिंपरी-चिंचवड अपर पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 05:13 PM2020-09-26T17:13:27+5:302020-09-26T17:13:57+5:30
पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलातील 465 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण..
पिंपरी : कोरोनाचा उद्योगनगरीतील विळखा वाढत असून, पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलातील 465 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यात वरिष्ठ अधिका-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातील 90 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासह 12 अधिकारी 33 कर्मचारी देखील विविध रुग्णालये, कोविड केअर सेंटर तसेच घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहर पोलीस दलात सुमारे 20 टक्के अर्थात 465 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 90 टक्के पोलिसांनी अर्थात 417 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलीस ठाणे, तपास पथके, गुन्हे शाखेचे युनीट, आयुक्तालय तसेच मुख्यालयातील अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच कर्मचारी यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मनुष्यबळ कमी असतानाच पोलीस कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने कामाचा ताण वाढत आहे. त्यात अपर पोलीस आयुक्त व दोन उपायुक्त यांना देखील बाधा झाल्याने वरिष्ठस्तरावर देखील कामाचा ताण आला आहे. आयुक्तालयांतर्गत केवळ तीन पोलीस उपायुक्त आहेत. त्यातील दोन उपायुक्त पॉझिटिव्ह झाल्याने उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यावर अतिरिक्त पदभार आला आहे.
सुरक्षेची साधने पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खबरदारी घेऊन कामकाज करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कोरोनासेलतर्फे करण्यात आले आहे.