Corona virus : पिंपरी परिवहन विभागाला दीड महिन्यात मिळाला 18 कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:18 PM2020-07-02T16:18:15+5:302020-07-02T16:19:12+5:30
पिंपरी : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आरोग्यविषयक सुचनांचे पालन करुन योग्य ती ...
पिंपरी : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आरोग्यविषयक सुचनांचे पालन करुन योग्य ती काळजी घेऊन कामकाज सुरळीत पार पडताना दिसून आले. सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करत चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात देखील सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करत काम सुरु झाले आहे. गेल्या दीड महिन्यात (18 मे ते 30 जून 2020) या कालावधीत विभागाला 18 कोटी 26 लाख 80 हजार 186 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगर यांनी दिली. याशिवाय या दरम्यान तब्बल 4750 वाहनांची नोंदणी झाली आहे.
पुण्यापाठोपाठ नवीन वाहनांच्या नोंदी, पासचे नुतनीकरण, वाहनांवरील कर भरण्यात पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचा क्रमांक लागतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर विभागाला महसूल प्राप्ती होते. मागील तीन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड आरटीओ विभागाचे कामकाज कोरोनाच्या भीतीने अंशत: सुरु होते. यात केवळ कार्यालयीन कामाला प्राधान्य देण्यात आले होते. यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष येऊन वाहन नोंदणी, पासचे नुतनीकरण या कामाकरिता प्रवेश नव्हता. आता प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेऊन कामकाज सुरु करण्यात आले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत दुचाकींची नोंद सर्वाधिक झाली असून त्याची संख्या 2951 इतकी आहे. तर चारचाकी वाहनांची संख्या 1402 एवढी आहे. याबरोबरच, कंसात वाहनांची संख्या ट्रँक्टर (137), रुग्णवाहिका (2), बांधकामासाठी लागणारे साधनसामुग्री (12), क्रेन (8), रिक्षा (1), खोदणारे यंत्र (11), मोठी वाहने (57), मोटार कँब (13), तीन चाकी वाहने (12), तीन चाकी वाहने (प्रवाशांसाठी 139)यांची नोंदणी क रण्यात आली आहे.
याप्रमाणे एकूण साडेचार हजार अधिक वाहनांकडून 18 कोटी 26 लाख 80 हजार 186 रुपयांचा नोंदणी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना अधिकारी सगरे म्हणाले, कोरोनामुळे प्रशासकीय विभागापुढे अनेक अडचणी होत्या. मात्र आता त्यावर मात करुन नागरिकांना सुविधा देण्यासाठी विभाग कार्यरत आहे. नेहमीपेक्षा कार्यालयात येणा-या नागरिकांची संख्या कमी असून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. वाहन नोंदणी विभागाजवळ सँनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित अंतर ठेऊन मास्क व ग्लोव्हज वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.