Corona Virus : पिंपरीत 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर खासगी रुग्णालयांना मिळणार 'प्लाझ्मा' बॅग्ज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:56 AM2020-08-11T10:56:25+5:302020-08-11T10:57:06+5:30
प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचे देशात अनेक ठिकाणी दिसून आले आहे..
तेजस टवलारकर
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला २०० एमएलची एक प्लाझ्मा बॅग तयार करण्यासाठी ५००० रुपये खर्च लागत आहे. १०० एमएलची बॅग तयार करण्यासाठी २५०० रुपये खर्च लागत आहे. त्यामुळे 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर खासगी रुग्णालयांकडून अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय 'वायसीएम'ने घेतला आहे.
खासगी रुग्णालयांना २०० एमएलसाठी ५००० रुपये, १०० एमएलसाठी २५०० रुपये असे दर ठरविण्यात आले आहेत. वायसीएमला जेवढा खर्च बॅग तयार करण्यासाठी येतो, तेवढेच पैसे खासगी रुग्णालयांकडून घेण्यात येणार आहे. वायसीएम आणि रुबी एलकेअरमधील रुग्णांना प्लाझ्मा बॅग मोफत देण्यात येणार आहेत.
वायसीएमच्या रक्तपेढीत ४ ऑगस्टपर्यंत ७८ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यातून एकूण १७६ प्लाझ्मा बॅग्ज तयार करण्यात आल्या आहेत. यातील १३६ बॅग्ज वायसीएम व रुबी एलकेअरमधील रुग्णांना मोफत देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयातील रुग्णांना ४० बॅग्ज मोफत देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णवाढीत मध्यम आणि तीव्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचे देशात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. शहरातील बऱ्याच रुग्णांना प्लाझ्मा थेरपीमुळे फायदा झाला आहे. त्यामुळे प्लाझ्मा बॅग्जची मागणी सध्या वाढली आहे.
वायसीएम रुग्णालय हे कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित करण्यात आले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित सर्व शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.