Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा वेग पाहूनच पुन्हा ‘रेडझोन’चा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:01 PM2020-05-20T21:01:40+5:302020-05-20T21:03:26+5:30
शहरात दोन दिवसांत चाळीस रुग्णांची भर
पिंपरी : रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडला दोन दिवसांपूर्वी नॉन रेडझोन संबोधले होते. मात्र, दोन दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत आढावा घेऊनच रेडझोनबाबत निर्णय घेणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रुग्णवाढीचा वेग पाहून चर्चा केली जाईल. पिंपरी-चिंचवड शहर शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत रेडझोनमध्येच असून, जुनेच नियम लागू असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात अधिक असल्याने शेजारचे शहर आणि रुग्णसंख्या कमी असूनही पिंपरी-चिंचवड हे रेडझोनमध्ये संबोधले जात होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये रेडझोन आणि नॉन रेडझोन असे दोनच झोन निश्चित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर जास्त असतानाही शहराला नॉन रेडझोन म्हटले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शहरात दोन दिवसांत चाळीस रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण वाढताना शहर नॉन रेडझोन कसे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवीन आदेश शुक्रवारी.....
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील चौथ्या लॉकडऊनच्या नवीन नियमावलीची शुक्रवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. दोन दिवसांत रुग्णवाढीचा वेग पाहून नियमावली तयार करणार आहोत. सरकारच्या निर्णयाच्या आधारावर नियमावली तयार केली जाणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्र महापालिकाच ठरविणार आहे. शुक्रवारपर्यंत शहर रेडझोनमध्येच असणार आहे. या ठिकाणी जुनेच नियम चालू राहतील. त्यानंतर वेगळी नियमावली प्रसिद्ध केली जाईल.
.......................................................................
आलेख कमी झाल्याने नॉन रेडझोन संबोधले
आयुक्त हर्डीकर म्हणाले, औद्योगिकनगरीतील रुग्णवाढीचा वेग कमी झाला होता. त्यामुळे ग्रीन झोन न म्हणता पिंपरी-चिंचवड शहराला 'नॉन रेडझोन' म्हटले आहे. रेडझोन घोषित केले नाही. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला नॉन रेडझोन मधून वगळण्याबाबत चर्चा झाली आहे. शनिवापर्यंत रुग्णवाढीचा दर कमी होता. परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, शहरात पुन्हा रविवारनंतर रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली. सरकारने त्यापूर्वीच झोन निश्चित केले होते. आनंदनगर झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढत असून, आनंदनगर किती लवकर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडेल, त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी दोन दिवस काहीच निर्णय घेतला जाणार नाही. पूवीर्चेच आदेश कायम असतील.