Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:48 IST2020-04-03T16:47:43+5:302020-04-03T16:48:08+5:30
दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या शहरातील २ दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर..

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’
पिंपरी : दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील काही जणांनी हजेरी लावली होती. यातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात हे रुग्ण राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडपोलिसांनी या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. या भागातील इमारतींमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या भागात इतर नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. येथील कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू घरपोहच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या मागणीनुसार त्यांना किराणा, भाजीपाला पुरविण्यात येत आहे.
निजामुद्दीन येथील तबलीगी मरकज येथे शहरातील काही नागरिकांनी हजेरी लावली असून, त्यातील काही जणांचे घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील काही नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी शहरातील बारापैकी ११ रुग्णांची तब्बेत ठणठणीत बरी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. शहरवासीयांसाठी ही बाब दिलासादायक असतानाच नव्याने दोन रुग्ण आढल्याने शहरवासीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ह्यसीलह्ण करण्यात आला आहे. तेथील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरवासीयांनी घराबाहेर न पडता प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे.- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.