Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये तीन इन्सिडन्ट कमांडर नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:36 PM2020-03-26T16:36:12+5:302020-03-26T16:41:29+5:30
अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक, व्यावसायिकांना पोलिसांकडून मिळणार पास
पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाउन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून इन्सिडन्ट कमांडर म्हणून तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनाश्यक वस्तूच्या विक्रेत्यांना पोलिसांकडून पास देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तालयाकरीता मुख्यालयातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची इन्सिडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती झाली आहे.
लॉक डाउन जाहीर करण्यात आल्यानंतर देखील काही नागरिक रस्त्यावर वाहने घेऊन येत आहेत. तसेच ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे पोलिसांकडून रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनचालकांना चोप देण्यात आला. यात अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व व्यावसायिकांना देखील अडविण्यात आल्याचे प्रकार समोर आले. अशा वाहनचालक व व्यावसायिकांकडे ओळखपत्र नसल्याने त्यांची अडचण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा वाहनचालक व व्यावसायिकांना पोलिसांकडून पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक व व्यावसायिकांना वाहतूक करण्यात अडचणी येणार नाहीत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 15 पोलीस ठाणे असून दोन परिमंडळांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, दिघी, भोसरी एमआयडीसी, चाकण, आळंदी व म्हाळुंगे पोलीस चौकीचा परिमंडळ एक अंतर्गत समावेश आहे. तर हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच रावेत व शिरगाव पोलीस चौकीचा परिमंडळ दोन अंतर्गत समावेश आहे.
संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचालक व व्यावसायिकांना अत्यावश्यक सेवेसाठीचा पास त्यांच्या परिमंडळ कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनचालक व व्यावसायिकांनी कागदपत्रांसह परिमंडळ कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिमंडळ एकसाठी 9834957526 या क्रमांकावर किंवा dcpzone1.pcpc-mh@gov.in यामेलवर संपर्क साधता येईल. तर परिमंडळ दोनसाठी 9529861471 या क्रमांकावर किंवा dcpzone2.pcpc-mh@gov.in या इ-मेलवर संपर्क साधता येणार आहे.