Corona Virus Vaccine : एका केंद्रावर दिवसाला शंभर जणांना टोचणार लस; पिंपरी शहरातील सोळा केंद्र सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:23 PM2021-01-13T12:23:51+5:302021-01-13T12:24:40+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे.
पिंपरी : औद्योगिकनगरीत १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. शहरात सोळा लसीकरण केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. एका केंद्रावर दिवसाला शंभर अशा १६०० जणांना लस टोचविण्यात येणार आहे. कोरोना वॉरीयर्स, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
.....
अशी आहेत केंद्र
शहरात सोळा केंद्र तयार केली आहेत. त्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात वायसीएम रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआयएस रुग्णालय, कामत हॉस्पीटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना या शासकीय रुग्णालयात तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, अक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल भोसरी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल थेरगाव, स्टर्लिंग हॉस्पीटल अॅण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. तसेच पिंपळेनिलख दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.
..............................
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकाने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फोटो आयडी तपासला जाईल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर अधार्तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास घरी सोडण्यात येईल. लसीकरणासाठी परिचारिका, आशा वर्कर यांची नेमणूक केली आहे. गोंधळ होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे.
डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी