Corona virus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:48 PM2020-04-11T15:48:51+5:302020-04-11T15:49:52+5:30
शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस चार दिवस पूर्णत:प्रतिबंध
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील भाजीमंडई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता पासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या भागात पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, त्या भागात करफ्यू लागू केला आहे. पिंपरीतील खराळवाडी, चिखली घरकुल, दिघी, थेरगाव आणि आता भोसरीचा परिसरही बंद केला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
कोवीड प्रादूर्भाव आणि व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक, प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
पिंपरी-चिंचवड हे शहर विविध गावांचे तयार झाले आहे. त्यामुळे विविध गावांमध्ये भाजीमंडई उभारण्यात आल्या आहेत. या भाजीमंडईमध्ये सध्या प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे.
.........................
बंद असणारी ठिकाणे
१) भोसरी गावातील लांडगे आळीजवळील भाजीमंडई
२) चिखली गावातील भाजीमंडई
३)चिंचवड गाव चापेकर चौकातील भाजीमंडई
४)आकुर्डी श्री विठ्ठल रूकिम्णी मंदिराजवळील भाजीमंडई
५) पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजीमंडई
६) थेरगाव डागे चौकातील भाजीमंडई
७) वाकड गाववाठाणातील भाजीमंडई
८) शहरातील उपनगरात भरणारे सर्व आठवडे बाजार
९) पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात फिरणाºया हातगाड्या
१०) कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी
११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री .
.....................................
११ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आदेशात नमूद केले आहे
.....................
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे गरजेचे आहे. बंद असतानाही अजूनही भाजीमंउई परिसरात नागरिक गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, लॉक डाऊनचे पालन करावे. कोरोनाचे सार्वजनिक संक्रमण रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. सर्दी खोकला किंवा ताप आल्यास दवाखाण्यात जाऊन उपचार घ्यावेत. तसेच हॅडवॉश करावा, साबनाने हात स्वच्छ करावेत. तसेच घराबाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. लॉक डाऊनचे पालन न करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.