Corona virus :पोलिसांनी करून दाखवले ते पिंपरी-चिंचवड महापालिकेला कधी जमणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:57 AM2020-09-10T11:57:57+5:302020-09-10T12:03:57+5:30
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नाही स्वतंत्र कोरोना सेल
नारायण बडगुजर-
पिंपरी : महापालिकेचे शेकडो कर्मचारी व अधिकारी कोेरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यातील १२ जणांचा मृत्यू झाला. तर शहरातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलीस आयुक्तालयाने पोलिसांसाठी कोरोना सेलची स्थापना केली. त्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचे मनोबल उंचावण्यात येते. त्यामुळे बाधितांपैकी ८० टक्के पोलिसांनी कोरोनाला हरविले असून, एकाचा मृत्यू झाला. पोलिसांसारखे शहाणपण महापालिका प्रशासनाला काही सूचले नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कोरोना सेल स्थापन केला. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक तसेच सात कर्मचारी या सेलमध्ये कार्यरत आहेत. तसेच ‘कोरोना फायटर’ असा व्हॉटसअप ग्रुप तयार केला असून, त्यातून कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांबाबत माहिती दिली जाते. सेलच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी अशा पोलिसांशी सतत संपर्कात राहून त्यांना बेड, औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आतापर्यंत शहरातील पावणेचारशेवर पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी त्यातील ८० टक्के पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात पोलिसांच्या कोरोना सेलचे महत्वपूर्ण योगदान आहे.
महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये, प्रशासकीय भवन, तसेच विविध विभाग व समित्या आहेत. तसेच आठ हजारांपर्यंत कर्मचारी आहेत. यातील बहुतांश कर्मचारी व अधिकारी कोरोनायोद्धा म्हणून कार्यरत आहेत. ही सेवा देताना त्यांना देखील कोरोना विषाणूंचा संसर्ग होत आहे. मात्र अशा किती अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत, किती जणांना कोरोना चाचणीची आवश्यकता आहे, कोरोनाचा संसर्ग झाला, किती जणांवर उपचार सुरू आहेत, त्यांना बेड तसेच औषधे उपलब्ध होत आहेत का, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी काय आहेत, यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र कोरोना सेल किंवा विभाग कार्यान्वित करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप तशी यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोणत्या व किती अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग झाला तसेच त्यातील किती जणांचा मृत्यू झाला याबाबत इत्यंभूत माहिती संकलित होत नाही. परिणामी त्यांच्यापर्यंत प्रशासनाकडून आवश्यक मदत पोहचत नसून, त्यांचे मनोबल उंचावले जात नाही.
औषधोपचारासह मनोधैर्य उंचावणे आवश्यक
कोरोना रुग्णांना औषधोपचाराइतकेच मनोबल उंचावण्याची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य आस्थापना म्हणून महापालिका प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. महापालिका आस्थापनेतील कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचारी यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र महापालिकेकडे तशी यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. परिणामी केवळ औषधोपचार व स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते कोरोनावर मात करीत आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. त्याअंतर्गत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांवर देखील उपचार केले जात आहेत. प्रत्येकोन आत्मविश्वासाने कोरोनाचा सामना करावा. स्वतंत्र कोरोना सेल किंवा विभाग कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, पिंपरी-चिंचवड