coronavirus : तोंडाला मास्क लावण्यास नकार दिल्याने एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:48 PM2020-04-01T12:48:03+5:302020-04-01T12:49:14+5:30
मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी येऊन पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्याच्या विराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : तोंडाला मास्क न लावता एक जण गर्दीतून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले. तोंडाला मास्क लाव आणि घरी जा, असे सांगितले. मात्र त्याने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी त्याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित ओंकारनाथ यादव (वय ३८, रा. महात्मा गांधीनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जी. एस. परदेशी (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. पिंपरी येथील डिलक्स चौक येथे सोमवारी (दि. ३०) रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान गर्दी झाली होती. त्यावेळी फिर्यादी व इतर पोलीस तेथे दाखल झाले. गर्दी करू नका, घरी जा, कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते.
त्यावेळी आरोपी गर्दीमधून येत होता. त्याने तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला हटकले. तोंडाला मास्क लावा आणि घरी जा, असे सांगितले. त्यामुळे आरोपी याला राग आला. तुम्ही मला का हटकता विनाकारण घरी जाण्यास का सांगता, असे आरोपी चिडून म्हणाला. मी येथून जाणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, मी घाबरत नाही, असे उद्धटपणे बोलून आरोपी याने फिर्यादी व इतर पोलिसांशी हुज्जत घातली. अरेरावीची भाषा वापरून हातवारे करून पोलिसांकडे बोटे दाखवून आरोपी बोलत होता. फिर्यादी व इतर पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात आरोपी याने अडथळा निर्माण केला. तसेच सध्या भारतात कोरोना व्हायरस प्रतिबंध योजना लागू असताना आरोपी याने कोणतीही दक्षता घेतली नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.