Coronavirus : पिंपरी चिंचवडमधील ९० संशयित रुग्णांना डिस्चार्ज; शहरात पॉझिटिव्ह रुग्ण १२
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:01 PM2020-03-21T15:01:37+5:302020-03-21T15:01:57+5:30
गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
पिंपरी : कोरोनाशी दोन हात करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभाग अहोरात्र झटत आहे. नऊ दिवसांत एकूण १०५ दाखल रुग्णांपैकी ९० जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज केले आहे. आज दाखल केलेल्या तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. दक्षता म्हणून शहरातील आणखी दोन रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातून आजपर्यंत एकूण १०८ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ९० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९० जणांना घरी सोडण्यात आले आहेत. उपचारार्थ दाखल पंधरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी तीन रुग्ण रुग्णालयात दाखल केले असून, या व्यक्तींचा कोरोनाकरिता घश्यातील द्राव्याचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हर्डीकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालये आणि वैद्यकीय विभाग सज्ज आहे. परंतु नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. आज तीन नवीन संशयित दाखल झाले असले तरी सोळा जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या रुग्णालयात पंधरा जण उपचार घेत आहेत. तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहे. तसेच होम क्वारंटाईनची केलेल्या नागरिकांची संख्या सहाशे तेरा आहे. तर चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २९ आहे.’’