coronavirus : मावळ तालुक्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ ; दीड हजार दुकाने बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:32 PM2020-03-31T18:32:52+5:302020-03-31T18:36:17+5:30
लाॅकडाऊनमुळे सलूनची दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने सलून चालकांचे माेठ्यप्रमाणावर हाल हाेत आहे. त्यामुळे काहीवेळ सलून चालू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
वडगाव मावळ : कोरोना व संचारबंदीमुळे हातावर पोट असणारा नाभिक समाजाचा सलुन व्यवसाय गेल्या तेरा दिवसापासून बंद असल्याने अडचणीत आला आहे. मावळ तालुक्यातील सुमारे दीडहजार सलुनची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपास मारिची वेळ आली आहे.
कोरोनाच्या संसर्गच्या पाश्वॅभूमीवर गर्दी टाळण्यासाठी संचार बंदी लागू झाली. अत्यावश्यक सेवेची दुकाने चालू राहीली. परंतू सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली. मावळ तालुक्यात सुमारे दिड हजार दुकाने असून नाभिक समाजाची संख्या सुमारे सात हजार आहे. यामध्ये दुकान मालक व कारागीर यांचा दैनंदिन प्रपंच चाललेला असतो.गेल्या तेरा दिवसापासून दुकाने बंद असल्याने व आगामी काही दिवस बंद राहणार असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. घरातील सर्वकाही जीवनावश्यक साहित्य संपू लागले आहे. रोजचे हातावर पोट असल्याने पैसे आणायचे तरी कोठून हा प्रश्न पडला आहे.
नाभिक संघाचे तालुकाध्यक्ष सोपान मोरे म्हणाले, तालुक्यात वडगाव, कामशेत, तळेगाव, देहूरोड, लोणावळा या शहरासह खेडोपाडी दीड हजार दुकाने आहेत. यामध्ये ९० टक्के दुकाने ही भाडोत्री आहेत. त्यांचे भाडे देखील अधिक आहे. तेरा दिवसापासून दुकाने बंद असल्याने घरामध्ये पैशाचा खळखळाट झाला आहे. मालकाचे भाडे कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नाभिक समाजासाठी शासनाने खासबाब म्हणून विषेश पॅकेज द्यावे.
तीन तास परवानगी द्यावी
नाभिक संघाचे अध्यक्ष राजू मोरे म्हणाले, वडगाव शहरात ४५ दुकाने आहेत.तेरा दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर उपास मारीची वेळ आली आहे. दिवसातून तीन तास दुकान उघडण्यास परवानगी दिल्यास घरकुटूंब चालेल.आम्ही दुकानात गर्दी देखील होऊन देणार नाही.