CoronaVirus News: राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 09:12 AM2020-07-04T09:12:15+5:302020-07-04T09:51:10+5:30
दोन-तीन दिवसांपासून सुरू होता श्वासोच्छवासाचा त्रास; चिंचवडमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
पिंपरी: महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. कोरोनाने आतापर्यंत 85 जणांचा बळी घेतला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. महापालकेत विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. आक्रमक, परखड असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोसह निमोनियाचेदेखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे@NCPspeaks चे नगरसेवक श्री. दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/gZg5ReXyAl
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 4, 2020
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दत्ता साने यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,' अशा शब्दांत पाटील यांनी साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे.