Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे पिंपरी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'बायोमेट्रिक थम्ब'पासून सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:51 PM2020-03-12T15:51:07+5:302020-03-12T15:51:35+5:30
कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना
पिंपरी : कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ' बायोमेट्रीक थम्ब ' इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही सवलत दिली आहे, याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्यानंतर पुणे शहरात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पाच जण संशयित रुग्णांपैकी तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये त्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना केल्या जात आहे.
बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. जेथे थम्ब मशीन कार्यान्वित आहे. तेथील महापालिका कर्मचा-यांना ३१ मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या वेळेत स्वाक्षरी करावयाची आहे. सर्व आहारण-वितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली हजेरी पत्रकाची नियमितपणे तपासणी करावयाची आहे. फिरतीचे कामकाज असलेल्या कर्मचाऱ्यांनी फिरती रजिस्टिरला नोंदी कराव्यात. त्याची तपासणी आहारण-वितरण अधिकारी, विभागप्रमुखांनी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे