Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:33 PM2020-03-12T15:33:10+5:302020-03-12T15:38:22+5:30
दुबईला गेलेल्या चाळीस प्रवाशांपैकी शहरातील तिघांचा समावेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात आढळलेला पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. दुबईला गेलेल्या चाळीस प्रवाशांपैकी शहरातील तिघांचा समावेश आहे. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत माजविली असतानाच हा व्हायरस आता भारतात दाखल झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यातही शिरकाव केला आहे. पुण्यात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, पिंपरी-चिंचवड पाच संशयितांपैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन असा संवाद सुरू आहे.
महापालिका सज्ज, खासगी रूग्णांलयांनाही सूचना
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला असून वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. महापालिका हद्दीत आपत्ती व्यस्थापन सज्ज झाला आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूची माहिती देण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची समन्वय म्हणून नियुक्ती केली आहे.ह्णह्ण
वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, एका खासगी ट्रॅव्हल कंपनीतर्फे पुण्यातून दुबईला प्रवाशी फिरायला गेले होते. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रवाशांचा समावेश होता. त्यापैकी तीन प्रवाशी आहेत. संबंधित टॅ्व्हल कंपनीबरोबर गेलेल्या प्रवाशांना शोधून त्यांच्याकडून आरोग्यबाबत माहिती घेण्यात येत आहे. संततुकारामनगर येथील वायसीएममध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.