कोरोनात बेरोजगार झाला अन् चाेरी करायला लागला; उच्चशिक्षित तरुणाकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:45 PM2022-06-26T18:45:23+5:302022-06-26T18:45:32+5:30
हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलमधील स्टाफ आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अटक
पिंपरी : हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलमधील स्टाफ आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच लाख २५ हजारांचे सात लॅपटॉप, ३५ मोबाईल फोन जप्त केले. कोरोना काळात नोकरी गेल्याने तरुणाने चोरी करण्यास सुरवात केल्याचे समोर आले. विकास संजय हगवणे (वय ३०, रा. भुकूम, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हॉस्पिटलमधून लॅपटॉप चोरीला जाण्याचे प्रकार घडले. वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तिन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मोबाईल, लॅपटॉप विक्री, दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांना पोलिसांनी सूचना दिल्या. सहाय्यक फौजदार बाबाजान इनामदार यांना माहिती मिळाली की, वाकड रोडवर एका लॅपटॉप विक्री दुरुस्तीच्या दुकानात पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती लॅपटॉप विक्रीसाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास हगवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेला लॅपटॉप चोरीचा असल्याचे त्याने सांगितले.
विकास हगवणे हा उच्चशिक्षित आहे. त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो वाघोली येथील खासगी कंपनीत नोकरी करत होता. कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यानंतर त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात केली. त्याने वाकड, पिंपरी, भोसरी, चतुःशृंगी, कोथरूड परिसरातील हॉस्पिटलमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरले. हॉस्पिटल परिसरात गर्दी असते. तिथून चोरी केल्यानंतर पळून जाण्यासाठी सोपे असते. त्यामुळे विकास हा केवळ हॉस्पिटलमध्येच चोरी करत असे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करायचा. त्यानंतर डॉक्टर आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचे लॅपटॉप व मोबाईल चोरून नेत असे.
विक्रीसाठी बिलबुकही केले तयार
चोरलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप स्वतःचे आहेत, हे भासवण्यासाठी त्याने विघ्नहर्ता मोबाईल शॉपी, डेक्कन जिमखाना, पुणे या दुकानाच्या नावाने बिलबुक तयार केले. त्या बिलांचा वापर करून तो चोरी केलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोन स्वतःचे असल्याचे भासवून दुकानदारांना विकत होता. त्याच्याकडून सात लॅपटॉप आणि ३५ मोबाईल फोन असा पाच लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे सात गुन्हे गुघडकीस आले.