चिंचवडमध्ये अनाधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:41 PM2018-05-22T17:41:34+5:302018-05-22T17:41:34+5:30
कारवाईमुळे शहरातील छुप्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहेत.
चिंचवड: शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा महापालिकेच्या वतीने सध्या सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिंचवड येथे सुरू असणाऱ्या अशाच चार बांधकामांवर महापालिकेच्या वतीने सोमवारी (दि.२२) कारवाई करण्यात आली. यामुळे छुप्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहेत. चिंचवड गावातील तानाजीनगर, केशवनगर तसेच इंदिरानगर व वाल्हेकरवाडी या भागात सुरू असणाऱ्या बांधकामांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईच्या दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच केशवनगरमध्ये दुसऱ्या मजल्यावर अनाधिकृत विट बांधकाम सुरू होते. व शिवमंदिर परिसरात दुसऱ्या मजल्यावर एक हजार स्केअर फुटाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाचे पिलर तोडून कारवाई करण्यात आली. इंदिरानगर व वाळेकरवाडीत सुरू असणाऱ्या अनाधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात आली. तसेच चिंचवड परिसरात सुरू असलेल्या बांधकामांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या होत्या. परंतु, त्याची दखल न घेतल्याने महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.