नगरसेवक घोळवे यांना मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:21 AM2018-10-24T01:21:58+5:302018-10-24T01:22:09+5:30
एमआयडीसीतील सिस्का एलईडी कंपनीत शिरून माल वाहतुकीचे कंत्राट आम्हाला का दिले नाही, असा जाब टोळक्याने विचारला.
पिंपरी : येथील एमआयडीसीतील सिस्का एलईडी कंपनीत शिरून माल वाहतुकीचे कंत्राट आम्हाला का दिले नाही, असा जाब टोळक्याने विचारला. या वेळी कंपनीत उपस्थित असलेले पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह कंपनीचे सुरक्षारक्षक आणि सुपरवायझर यांना सात जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. हल्लेखोरांनी घोळवे यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. हल्लेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकास अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक घोळवे (वय ४२, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी हल्लेखोरांविरूद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी संतोष मांडेकर, शरद मांडेकर (दोघेही रा. आंबेठाण, ता. खेड), मनोज ओवले, विशाल पाटील (रा. धुळे, पूर्ण नावे नाहीत ) व इतर अनोळखी तीन अशा सात आरोपींविरोधात कंपनीत शिरून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद मांडेकरला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार अधिक तपास करीत आहेत.
>भाजपाचे नगरसेवक घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. त्यांचे सिस्का एलईडी कंपनीत सुरक्षारक्षक पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानिमित्ताने ते कंपनीत गेले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कंपनीत सुरक्षारक्षकांच्या कामाचा आढावा घेत असताना अचानक सात जणांचे टोळके कंपनीत आले. वाहतुकीचे कंत्राट आम्हालाच दिले पाहिजे, असे म्हणत ते जोरजोरात ओरडू लागले. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. लोखंडी रॉड, दगड व लाथा-बुक्क्यांनी त्यांनी सुरक्षारक्षक, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राटदार घोळवे यांना जबर मारहाण केली.