‘अनधिकृत’मुळे नगरसेवक अडचणीत
By admin | Published: October 12, 2016 02:11 AM2016-10-12T02:11:49+5:302016-10-12T02:11:49+5:30
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्याचे भांडवल करून निवडणूक लढणारे अनेक नगरसेवक या वेळी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यानेच अडचणीत येणार आहेत.
पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्याचे भांडवल करून निवडणूक लढणारे अनेक नगरसेवक या वेळी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यानेच अडचणीत येणार आहेत. उमेदवारांना निवडणूक अर्जाबरोबर स्वत:च्या अथवा कुटुंबीयांच्या नावे अनधिकृत बांधकाम नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांत अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकाम नियमित करून देणार, अशी केवळ आश्वासने देऊन यापूर्वी निवडणुका लढल्या. आता हा मुद्दा कळीचा बनला असून, उमेदवारांसाठीच तो अडचणीचा ठरणार आहे.
महापालिकेची २०१२ची निवडणूक लढून नगरसेवक झालेल्यांपैकी अनेक जणांनी अनधिकृत बांधकामे केल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. सत्ताधारी राष्टवादी काँग्रेसचे बहुतांशी नगरसेवकांचा त्यात समावेश असल्याने महापालिका सभेत याबाबतचा निर्णय होऊ शकला
नाही.
निवडणूक खर्चाची मर्यादा चार लाख आहे. तीन अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जाणार आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराने निवडणूक विभागाला सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे अधिकारी यशवंत माने यांनी दिली. (प्रतिनिधी)