चऱ्होलीत दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: March 22, 2017 03:12 AM2017-03-22T03:12:41+5:302017-03-22T03:12:41+5:30
पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर
मोशी : पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर परिस्थिती चऱ्होली परिसराला अनुभवायला मिळत आहे. चऱ्होली गावठाण परिसरातील बोरेआळी, नवनाथ आळी, कोळीवाडा परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
असे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीसारखे आजार होऊ लागले आहेत.
याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही ढिम्म प्रशासन तक्रारींचा निपटारा करण्यात अयशस्वी ठरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
चऱ्होली गावठाणातील भूमिगत जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या असून त्यामुळे परिसरात शेकडो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्याबाबत कित्येक नागरिकांनी वारंवार महापालिकेत तक्रारीही दाखल केल्या; पण स्मार्ट महापालिका प्रशासनाला अद्याप जलवाहिन्यांची गळती सापडत नसून, नागरिकांच्या आरोग्यावरील टांगती तलवार
कायम आहे. कोळीवाडा परिसरातील रहिवासी अनिता वाबळे, अभिषेक वाबळे, सुवर्णा वाबळे, जया वाबळे, स्वप्नील वाबळे, पूजा वाबळे, नंदकुमार आढाव, स्वप्नील आढाव, ओंकार आढाव, रोहिणी आढाव,
पद्मा कदम व ललिता आढाव या नागरिकांना दूषित पाण्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. (वार्ताहर)