मावळ तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतीमध्ये मेडिक्लोर खरेदीत भ्रष्टाचार; चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:29 PM2017-11-23T15:29:56+5:302017-11-23T16:05:03+5:30
मावळ तालुक्यातील सुमारे १०४ ग्रामपंचायतीमध्ये मेडिक्लोर खरेदी संदर्भातील बोगस निविदा सादर केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी दत्तात्रय काजळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई यांना निवेदनादवारे केली आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सुमारे १०४ ग्रामपंचायतीमध्ये मेडिक्लोर खरेदी संदर्भातील बोगस निविदा सादर केल्या प्रकरणी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी दत्तात्रय काजळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई यांना निवेदनादवारे केली आहे.
मावळ तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीमध्ये सन २०१० ते २०१७ या कालावधीत खोटी कोटेशन सादर करून मेडिक्लोरची एक बाटली १० मिलीची किंमत बाजारभावाप्रमाणे १५ ते १७ रुपये आहे. परंतु ग्रामपंचायतीने ही एक बाटली ४० ते ४५ रुपयांत खरेदी केली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या कुठल्याही मासिक सभेचा ठराव व मान्यता आढळून येत नाही व मासिक सभेचा मीटिंगमध्ये मंजुरी घेतलेली नाही. संबंधित ग्रामपंचायत व ग्रामपंचायत विभागाने मेडिक्लोर खरेदी करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय पडताळणी आरोग्य विभागाकडून करणे अपेक्षित होते. परंतु वरील कालावधीमध्ये आरोग्य विभागाने मेडिक्लोर आरोग्यास अपायकारक आहे किंवा हानिकारक आहे, याची कुठलीही पडताळणी केलेली नाही. तरी संबंधित आरोग्य विभाग या प्रकरणी दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सन २०१० ते २०१७ या कालावधीत ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी म्हणून तेव्हापासून असणारे ते आजपर्यंत अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे आॅडिट नोट झालेली दिसून येत नाही. मेडिक्लोर खरेदी प्रकरणामध्ये विस्तार अधिकाऱ्यांनी आर्थिक लागेबांधे असल्यामुळे ग्रामसेवकांची वरिष्ठांकडे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी देखील या प्रकरणात दोषी दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याच कालावधीत तत्कालीन व आजतागायत तालुक्याचे कामकाज यांच्या अधिपत्याखाली चालते ते गटविकास अधिकारी सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत व मेडिक्लोर खरेदी संदर्भात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दत्तात्रेय काजळे यांच्याकडून निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना देखील देण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्रथमदर्शनी अशा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत नाहीत परंतु तसे काही असल्यास विस्तार अधिकाऱ्यांना त्वरित चौकशीचे आदेश दिले जातील.
- नीलेश काळे , गटविकास अधिकारी वडगाव मावळ