जामिनासाठी बनावट कागदपत्रांव्दारे न्यायालयाची दिशाभूल, पिंपरीतील रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:58 PM2021-06-16T15:58:10+5:302021-06-16T15:58:18+5:30
सहा जणांना अटक, पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी दोन वेगेवेगळे गुन्हे दाखल
पिंपरी: गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयाची दिशाभूल केली. पिंपरी येथे मंगळवारी (दि. १५) हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी दोन वेगेवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पहिल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी रोहित सुधाकर पिंजरकर यांनी फिर्याद दिली आहे. सुनील मारुती गायकवाड (वय ५२), नंदा एकनाथ थोरात (वय ४३), पौर्णीमा प्रशांत काटे (वय ३०, तिघेही रा. आळंदी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुसऱ्या प्रकरणात पोलीस कर्मचारी उमेश वानखडे यांनी फिर्याद दिली आहे. सलमान ताजुद्दीन मुजावर (वय २४), समाधान प्रभाकर गायकवाड (वय २३), श्रीधर मगन शिंदे (वय २३, तिघेही रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी वरील दोन्ही गुन्ह्यांत अटक केलेले आरोपी हे बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे, अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात. जे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्टाच्या कामासाठी हजर राहणार नाहीत, अशाना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करून ठराविक व ओळखीच्या वकिलांच्या मागणीनुसार कोर्टात जामीनदार म्हणून हजर केले जात असे. त्याआधारे आरोपींना कोर्टातून जामिनावर सोडले जात असे. आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला आहे. बनावट नावाची बोगस कागदपत्रे पिंपरी न्यायालय येथे बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ बाळगली.
अटक आरोपींनी शिवाजीनगर कोर्ट पुणे आणि इतर कोर्टामध्ये, बनावट कागदपत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली. बोगस कागदपत्रे बाळगून जामीन मिळवून देण्यासाठी आरोपी हे बोगस जामीनदार म्हणून पिंपरी कोर्ट येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोन वेगेवेगळे गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.