सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:51 PM2021-02-24T19:51:16+5:302021-02-24T19:51:43+5:30
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय ५४, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. जवाहर ढोरे हा महापाैर उषा ढोरे यांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस पिंपरी-चिंचवड साैर्द्य स्पर्धेचे जवाहर ढोरे यांनी आयोजन केले होते. महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि. २२) सायंकाळी ही स्पर्धा पार पडली. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून स्पर्धे दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी रॅम्प वाॅक केले. त्यावेळी महापाैर उषा ढोरे यांनी मास्कचा वापर न करता रॅम्प वाॅक केला. चित्रपट अभिनेत्रीही या वेळी उपस्थित असल्याने प्रेक्षागृहात तोबा गर्दी झाली होती. अभिनेत्री आणि महापाैर यांच्या भोवती मोठा घोळका झाला. घोळक्यातील अनेकांनी मास्कचा वापर केला नाही. तसेच एकत्र येऊन जमाव केल्याने या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली.
अभिनेत्रीवरही कारवाई
साैंर्द्य स्पर्धेला उपस्थित असलेल्या अभिनेत्रीनेही मास्कचा वापर केला नाही. तसेच स्वत:भाेवती घोळका करून घेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नाही. त्यामुळे संबंधित अभिनेत्रीवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. प्रेक्षागृहात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.