भाजपाच्या चार नगरसेवकांवर गुन्हे ; निवडणुकीतील भयमुक्तचे आश्वासन हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:57 AM2018-06-08T05:57:38+5:302018-06-08T05:57:38+5:30
‘भय, भ्रष्टाचारमुक्त कारभार’ असे आश्वासन देऊन फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले.
पिंपरी : ‘भय, भ्रष्टाचारमुक्त कारभार’ असे आश्वासन देऊन फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले. यामध्ये काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारे आहेत.
महापालिकेतील भाजपाचे क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्यावर सोमवारी हाणामारी आणि दुकानाच्या तोडफोडीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. ‘भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त शहर’ असे नागरिकांना आश्वासन देऊन भाजपाने महापालिका निवडणुकीत बाजी मारली. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालय गरजेचे असल्याने त्याबाबत पाठपुरावा झाला. पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागूनही लोकप्रतिनिधींकडून गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये घडत आहेत. लोकप्रतिनिधींचा गुन्हेगारी घटनांत वाढता सहभाग ही चिंतेची बाब बनली आहे. अन्यथा पोलीस आयुक्तालय होऊनही शहरवासीयांना भयमुक्त जीवन जगणे अशक्य असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
लोकप्रतिनिधींवरील गुन्हे चिंताजनक
क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, संत तुकारामनगर प्रभागाच्या नगरसेविका सुजाता पालांडे, संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक तुषार हिंगे, विशालनगर (वाकड) येथील नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हिंगे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती येथून भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले नगरसेवक तुषार कामठे यांच्याविरोधात सांगवी ठाण्यात बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. टपरीचालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संत तुकारामनगर (पिंपरी) येथील नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.