गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा

By admin | Published: April 27, 2017 04:44 AM2017-04-27T04:44:20+5:302017-04-27T04:44:20+5:30

येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने अहमदनगरमधील कर्जत येथे केलेल्या आत्महत्येला वेगळे वळण लागले आहे.

Crime against the school teacher | गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा

गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा

Next

पुणे : येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने अहमदनगरमधील कर्जत येथे केलेल्या आत्महत्येला वेगळे वळण लागले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हवेलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली क्र.१ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांनी कर्जतमध्ये विष घेऊन आत्महत्या केली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी गुप्त ठेवली होती. बुधवारी दुपारी त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्याला आल्यानंतर चिठ्ठी दाखवण्यात आली. हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या वेळोवेळी होणाऱ्या जाचाला कंटाळून व प्रशासकीय कारवाईच्या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे त्या चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे उघड झाले.
परिहार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हवेली तालुका शिक्षक संघाने गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. हवेली तालुक्यातील सुमारे ९५ टक्के शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिहार या तीन महिन्यांपूर्वी वाघोली परिसरातील एका पाषाण शाळेच्या तपासणीसाठी गेल्या असताना त्या शाळेचे पदाधिकारी व शिक्षकांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराची तक्रार वाघमारे यांच्यासह सहा शिक्षकांनी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु हे त्यांनी नकार दिला. तेव्हा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व निलंबन का करू नये, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई व शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी बजावली होती.
कारवाई न झाल्यास ४ मे रोजी मोर्चा काढणार
हवेली तालुका शिक्षक संघाचे नेते राजेश काळभोर, तालुकाध्यक्ष रमेश कुंजीर, कार्याध्यक्ष सुरेश कटके व सर्व पदाधिकाऱ्यांनी वाघमारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास ४ मे रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हवेली तालुका शिक्षक संघाचे नेते राजेश काळभोर, तालुकाध्यक्ष रमेश कुंजीर यांनी दिली.
सीआयडी चौकशी व्हायला हवी : विनायक ढोले
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र याबाबत संबंधित शिक्षण विभाग गंभीर नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य शिक्षक संघटनेचे पदाधिकारी विनायक ढोले यांनी केली.
आमचा संबंध नाही
‘त्या’ सहा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांच्या सहीने नोटीस काढण्यात आली होती. यासंदर्भात त्यांना विचारले असता, त्यांनी हात झटकले. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Crime against the school teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.