Pimpri Chinchwad: गुन्हे शाखेकडून छापेमारी, दारुभट्ट्या उद्ध्वस्त; गांजा विक्रीप्रकरणी ४ महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:54 AM2024-02-16T09:54:29+5:302024-02-16T09:55:06+5:30
दारूभट्टी तसेच गांजा प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली.
पिंपरी : दारू भट्टी तसेच गांजा प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली. यात चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळूस येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा मारला. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला.
काळूस येथील कारवाई प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलिस अंमलदार राजकुमार हणमंते यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (रा. काळूस, ता. खेड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड याने काळूस गावात भाम नदीच्या काठावर गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. आठ हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी राठोड याने कच्चे रसायन वापरून भट्टी लावली होती. पोलिसांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
पवना नदीच्या काठावर केलेल्या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलिस अंमलदार राजकुमार इघारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावली होती. तिने तीन हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लावलेले तीन लाख ५०० रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलिस आल्याची चाहूल लागताच संशयित महिला पळून गेली.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अंमलदार मितेश यादव यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार महिलांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर येथील एका टपरी समोर चार महिला गांजा विक्रीसाठी आल्या असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून चारही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक किलो ४३० ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख एक हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.