५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीत बांधकाम व्यावसायिकांविरोधात दोन गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 04:51 PM2020-09-26T16:51:52+5:302020-09-26T16:53:37+5:30
बांधकाम व्यवसायिकांनी सदनिकेचा ताबाही दिला नाही. तसेच, पैसेही परत केले नाहीत..
पिंपरी : सदनिकेचा ताबा न देता ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
विशाल संपत खुडे (वय३८, रा. विरंगुळा हाउसिंग सोसायटी, वेणूनगर, वाकड) यांनी २८ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. तर, संदीप काशिनाथ कर्डीले (वय ३७, रा. वात्सल्य बिल्डिंग, महादेव कॉलनी, थेरगाव) यांनी ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.
साई कन्स्ट्रक्शनचे भागीदार शैलेश चांगदेव लांडे (वय ३१, पिंपळे सदन, मराठी शाळेजवळ, कासारवाडी), पंकज नामदेव रानवडे (वय ३०, संतकृपा बिल्डिंग, रानवडे वाडा, कासारवाडी), प्रतीक के. भोसले (वय ३७, रेल्वे गेट जवळ, जवळकर चाळ, कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मीबाई उद्यानाजवळ आशा निवास प्रकल्पात फिर्यादी यांनी सदनिका घेतली होती. हा प्रकल्प अपूर्ण आहे. बांधकाम व्यवसायिकांनी सदनिकेचा ताबाही दिला नाही. तसेच, पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.