शहरालगतचे फार्महाऊस होताहेत गुन्हेगारीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:40 AM2018-11-25T02:40:48+5:302018-11-25T02:40:51+5:30

- संजय माने पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेली फार्महाऊस गुंडांची आश्रयस्थाने आणि गुन्हेगारीची केंद्रे बनू ...

Crime centers of the city are in the farmhouse | शहरालगतचे फार्महाऊस होताहेत गुन्हेगारीचे केंद्र

शहरालगतचे फार्महाऊस होताहेत गुन्हेगारीचे केंद्र

Next

- संजय माने


पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेली फार्महाऊस गुंडांची आश्रयस्थाने आणि गुन्हेगारीची केंद्रे बनू पाहत आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे.


खेड तालुक्यातील चांदूस कोरेगाव येथील एका फार्महाऊसमध्ये विक्रीसाठी आणलेल्या पिस्तूल आणि काडतुसांचा साठा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी फार्महाऊसवरून तब्बल ७ पिस्तूल आणि २१ काडतुसे जप्त केली.


पिंपरी-चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपी योगेश बाजीराव दौंडकर (वय ३५, रा. शेलपिंपळगाव) यास मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मोशीजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे आणि दुचाकी यासह त्याला अटक केली होती. पोलिसांनी त्याचे रिमांड घेऊन अधिक चौकशी केली असता, खेड तालुक्यातील चांदूस कोरेगाव या ठिकाणी आणखी पिस्तूल ठेवले असल्याची माहिती त्याने दिली.


तपास पथकाने फार्महाऊस येथे जाऊन आरोपीने लपवून ठेवलेले ७ देशी बनावटीचे पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे हस्तगत केली. या घटनेमुळे गाव, खेड्याच्या ठिकाणचे शहरातील बड्या मंडळींचे फार्महाऊस अवैध कामासाठी उपयोगात आणले जात असल्याबद्दलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निमित्ताने निर्जन ठिकाणच्या फार्महाऊसवर नेमके काय चालते? याचा शोध घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

चाकण परिसरात वाढले फार्महाऊस
चाकणला आंतरराष्टÑीय विमानतळ होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, पुणे, चाकण, तळेगाव येथील अनेकांनी पाईट,चांदूस कोरेगाव, किवळे या भागात जमिनी खरेदी केल्या. मोठ्या प्रमाणावर जमिनीत गुंतवणूक केल्यानंतर काहींनी त्या पट्ट्यात फार्महाऊस बांधली. भामा नदीच्या अलीकडे तसेच पलीकडे निर्जन भागात अशी फार्महाऊस उभारण्यात आली आहेत.

निर्जन ठिकाणांचा गुन्हेगारीसाठी वापर
आंबीवरून तळेगाव एमआयडीसी, फेज दोन आणि चाकण येथे जाण्यास मार्ग असल्याने या भागात शहरातील बड्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर जागा घेतल्या आहेत. चाकणऐवजी पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्चित झाली. चाकण येथील विमानतळाचा प्रस्ताव बारगळला, मात्र विमानतळासाठी शासनाने ज्या जमिनींचे भूसंपादन केले होते, त्या जमिनी एमआयडीसी फेज पाच करिता वापरात आणल्या जाणार आहेत.
या भागात एमआयडीसीचा विस्तार होणार असल्याने जमिनीला भविष्यातही मोठी किंमत येणार आहे. हे लक्षात घेऊन या भागात जमिनी खरेदी केलेल्या काहींनी आपली फार्महाऊस उभारली आहेत. सर्वच फार्महाऊसमध्ये गैरप्रकार घडत नसले तरी काही फार्महाऊसचा गुन्हेगारी कारवायांसाठी उपयोग होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. गोनवाडी, बोरदरा, रोहकल या भागातही जमिनी खरेदी करून फार्महाऊस बांधण्यास प्राधान्य दिले जात आहे. केवळ चाकणच नव्हे तर, तळेगाव परिसरात नव्हे तर मुळशी, तळेगाव, लोणावळा व मावळ परिसरात खेडोपाड्यात निर्जन स्थळी फार्महाऊस साकारली असल्याचे दिसून येते.

Web Title: Crime centers of the city are in the farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.