अल्पवयीन मुलीचा विवाह करणे भोवले; गुन्हा दाखल, तिघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:53 PM2021-03-10T17:53:22+5:302021-03-10T17:54:48+5:30
मुलीशी विवाह करणारा तरुण, त्याचे वडील व आई यांना अटक
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी येथे हा प्रकार २ ऑक्टोबर २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुलीशी विवाह करणारा तरुण, त्याचे वडील व आई यांना अटक करण्यात आली आहे. विवाहानंतर मुलगी गरोदर राहिल्याने हा बालविवाहाचा हा प्रकार समोर आला.
मुलगा इसकपाण्डी, वडील शंकर मुथ्थू, आई मंगेश्वरी (सर्व रा. मिडल स्ट्रीट, किला थेरू, कोविलम्म पुरम, तामिळनाडू), अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, असे आरोपींना माहिती होते. तरीही आरोपींनी संगनमत करून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इसकपाण्डी याचा विवाह लावून दिला. विवाहानंतर मुलगी नऊ महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर बालविवाहाचा हा प्रकार उघडकीस आला.
तामिळनाडू येथील नानगुरी येथे ए डब्लू पी एस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथून हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आले आहे.