पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
By नारायण बडगुजर | Updated: April 13, 2025 23:07 IST2025-04-13T23:06:44+5:302025-04-13T23:07:18+5:30
गळ्याला कोयता लावून आरोपी पतीने अत्याचार केल्याचेही समोर

पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
पिंपरी : न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला म्हणून विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तसेच हळदीकुंकू लावलेला लिंबू पत्नीच्या गुप्तांगावर पिळले. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख, विशालनगर भागात १ जून २०२४ रोजी ही घटना घडली.
पीडित ३६ वर्षीय महिलेने याप्रकरणी ११ एप्रिल २०२५ रोजी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २००४ मध्ये लग्न झाले होते. दरम्यान, पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर पीडित महिला आणि तिचा पती विभक्त झाले. पतीकडून पोटगी मिळण्यासाठी पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, पीडित महिलेचा पती १ जून २०२४ रोजी फ्लॅटमधुन साहित्य शिफ्टिंग करीत होते. त्यावेळी पीडित महिला तेथे गेली. तेव्हा फ्लॅटमधील साहित्य पार्किंगमध्ये आणले होते. तुला काही साहित्य मिळणार नाही, असे बोलून पती त्याच्या फ्लॅटमध्ये गेला. मुलांच्या शाळेच्या वह्या व पुस्तके, गादी आणण्यासाठी पीडिता फ्लॅटमध्ये गेली. पीडित महिलेचा विभक्त राहत असलेल्या पतीने दारुच्या नशेत पीडित महिलेला शिवीगाळ केली. तुला घटस्फोट हवाय ना, पोटगीची नोटीस देऊन न्यायालयात केस केली ना, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने दरवाजा बंद केला. त्याने पीडित महिलेच्या गळ्याला कोयता लावला. त्यानंतर पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्याच्या हातात हळदीकुंकु लावलेला लिंबु होता. लिंबु त्याने पीडित महिलेच्या गुप्तांगावर पिळले. मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे, तू वेडी होणार आहे, असे तो म्हणाला. हे प्रकरण कोणाला सांगितले तर मी तुझा मर्डर टाकतो, अशी धमकी देऊन तो फ्लॅटमधून बाहेर गेला.
‘माणुसकीला काळीमा फासणारी घटना’
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. पीडितेला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी केली आहे.