वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 08:34 PM2021-02-23T20:34:01+5:302021-02-23T20:34:45+5:30
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले कारवाईचे आदेश
पिंपरी : कुख्यात गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी उर्से टोलनाका येथे दहशत माजविल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या नाक्यावर टोल न भरता वाहने घेऊन गेल्याने मारणे व साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.
कुख्यात गुंड गजा मारणे हा १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात होता. त्यावेळी उर्से टोलनाका येथे त्याच्या साथीदारांनी आरडाओरडा करून फटाके वाजवून ड्रोनव्दारे त्याचे चित्रिकरण करून दहशत माजविली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गजा मारणे फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. यात मारणे व त्याच्या साथीदारांनी टोल न देता वाहने गेल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सिक्युरिटी एजन्सीचा परवाना होणार रद्द
द्रुतगती मार्गावरून काढलेल्या मिरवणुकीत गुंड मारणे याच्यासोबत स्टार सिक्युरिटी एजन्सीचे बाऊन्सर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या एजन्सीचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करून परवाना रद्द करण्यात येणार आहे.
टोन न भरता वाहन घेऊन जाणे ही संबंधित टोल वसूल करणारी कंपनी व शासनाची फसवणूक आहे. मारणे याच्या वाहनांचा ताफा उर्से टोल नाका येथे असताना त्यांनी इतर वाहनांना बाजूला करून त्यांची वाहने टोल न देता नेली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड