‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:17 IST2021-06-12T16:17:04+5:302021-06-12T16:17:47+5:30
महिना दोन हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी खंडणी मागितली.

‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड
पिंपरी : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यावर वाकडपोलिसांनी खंडणी तसेच दरोडा, असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पाच आरोपींना अटक केली आहे. म्हातोबानगर वाकड येथे ही घटना घडली.
किरण प्रकाश घाडगे (वय २५), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय २२), मयूर संजय अडागळे (वय २६), सागर प्रकाश घाडगे (वय २७), अविनाश नलावडे (सर्व रा. वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मारुती साहेबराव काळे (रा. वाकड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ११) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसर आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह कॅपिटल टॉवरच्या बाजूला, म्हातोबानगर, वाकड येथे गुरुवारी (दि. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या जवळ आले. महिना दोन हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी खंडणी मागितली. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या पाच रिक्षांसह इतर रिक्षांच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र रिक्षा बाजूला घेत असताना आरोपींनी लाकडी दांडक्याचा धाक दाखवून रिक्षा बाजूला काढू दिल्या नाहीत, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात सचिन अशोक शेलार (वय २६, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरिल पाचही आरोपींच्या विरोधात दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह कॅपिटल टॉवरच्या बाजूला म्हातोबानगर येथे शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाबाराच्या सुमारास गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या जवळ आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे दारुसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींना राग आला. त्यातून आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच आरोपी किरण घाडगे याने फिर्यादीच्या खिशातील ६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच रिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार तपास करीत आहेत.