पिंपरीतील उद्योजकावर ६२ लाखांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 07:17 PM2021-02-11T19:17:45+5:302021-02-11T19:20:30+5:30
कंपनीसाठी साहित्य खरेदी करून पैसे न दिल्याचे प्रकरण
पिंपरी : कंपनीसाठी माल खरेदी करून त्याचे पैसे न देता उद्योजकाने त्याच्या कंपनीचे स्थलांतर करून घेतले. तसेच खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता एकूण ६२ लाख १६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी येथील वासुली तसेच कुरुळी येथे २० जुलै २०१९ ते १४ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी उद्योजकाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमा भाऊसाहेब गलांडे (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ७) फिर्याद दिली. त्यानुसार विपूल कासार वजरीनकर (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी, मूळ रा. बारामती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भोसरी येथे एम. जी. इंटरप्रायजेस या नावाची फर्म असून ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. तसेच आरोपी याची फ्रन्टीयर रोबोटिक अॅंड अॅटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. आरोपीने त्याच्या कंपनीसाठी फिर्यादी यांच्या फर्मकडून हार्डवेअर, मेकॅनिकल वस्तू, तसेच इतर माल अशी एकूण १७ लाख आठ हजार ५०० रुपयांची खरेदी केली. त्यातील सहा लाख ७९ हजार ८२५ रुपये दिले. मात्र उर्वरित १० लाख २८ हजार ६७४ रुपये आरोपीने दिले नाही. दरम्यान आरोपीची फ्रन्टीयर रोबोटिक अॅंड अॅटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कुरुळी येथून वासुली येथे शिफ्ट झाली.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून कंपनीसाठी साहित्य खरेदी करून त्यांचे १० लाख २८ हजार ६७४ रुपये तसेच अनुजा अरविंद ताठे (वय ३०, रा. पिंपरीगाव) यांच्याकडून ३२ लाख ४५ हजार ४६४ रुपये, विवेक श्रीराम जकाते (वय ३३, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्याकडून सात लाख एक हजार ४२ रुपये, सुहास संतोष कुलकर्णी (वय ५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांच्याकडून पाच लाख २२ हजार १२८ रुपये, शिवदास जयप्रकाश सातपुते (वय ३९, रा. आकुर्डी) यांच्याकडून सहा लाख ९८ हजार ५५४ रुपये, ज्ञानेश्वर सुभाष निकम (वय ३३, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्याकडून २० हजार ४८० रुपयांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देता आरोपीने त्यांची एकूण ६२ लाख १६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली.