गुन्हेगारी कमी होणार - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:27 AM2018-08-17T00:27:03+5:302018-08-17T00:27:16+5:30
चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला.
पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. आयुक्तालयामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या आवारात सकाळी ११ वाजता ध्वजवंदन कार्यक़्रम घेण्यात आला. पालकमंत्री बापट पुढे म्हणाले, शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होणार असा शब्द दिला होता. तो शब्द पाळला आहे. पोलीस आयुक्तालय झाले आहे. मनुष्यबळ उपलब्ध होईल, अन्य सुविधांचीही पूर्तता होईल. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरू आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाचे कामकाज काही दिवस आॅटो क्लस्टर येथून चालणार आहे.
लवकरच पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील. महापालिकेच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध
करून दिल्या जातील. त्यानंतर पूर्ण क्षमतेने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल, असे बापट यांनी नमूद केले.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, शहरात पोलिसांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकेल. गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे शक्य होईल.
संपर्क साधताच होणार पोलीस हजर : आयुक्त पद्मनाभन
१पिंपरी : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला.
२पत्रकारांशी संवाद साधताना, आयुक्त पद्मनाभन बोलत होते. औद्योगिकनगरीचे गुन्हेगारीत रूपांतर झाले असल्याचे बोलले जाते, अशा परिस्थितीत आपण या शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके काय करणार? या प्रश्नाला आयुक्त पद्मनाभन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलीस आयुक्त झाल्यामुळे अधिकचा स्टाफ उपलब्ध होणार आहे. स्वतंत्रपणे विविध विभागाचे काम चालणार आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. जनता पोलिसांकडे नाही तर पोलीस जनतेकडे जातील, अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे.
३एखादी घटना घडते, त्यानंतर पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दखल घेतली तर जो परिणाम जाणवतो, तो परिणाम अर्धा तासाने दखल घेतल्यानंतर जाणवत नाही, आणखी काही तासांनी दखल घेतल्यानंतर वेगळाच परिणाम दिसून येतो. घटना एकच परंतु परिणाम वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून दखल घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. चौका चौकांत पोलीस असतील, कायदा, सुव्यवस्थेच्या दक्षतेसाठी पोलीस कायम सज्ज आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा शहराची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.