पिंपरीत रावण टोळीशी संबंधित गुन्हेगाराला अटक; एक पिस्तूल, दोन काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:36 PM2021-07-04T12:36:36+5:302021-07-04T12:37:11+5:30
रावेत परिसरात गुंडा विरोधी पथकाची कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी: अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी रावण टोळीशीसंबंधित गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. रावेत परिसरात गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
नीलेश विजय गायकवाड (वय २५, रा. वारजे, पुणे) याला अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हा रावण टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडे पिस्तूल असून, तो जाधववस्ती, रावेत येथे उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजारांचा ऐवज जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत गुंडा विरोधी पथकाने अमोल उर्फ धन्या गजानन गोरगले (वय ३१, रा. पुनावळे, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धन्या गोरगले याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो पुनावळे येथे वावरत असताना मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.