चौकशी समितीच्या शिफारशींना कोलदांडा

By admin | Published: June 20, 2017 07:17 AM2017-06-20T07:17:48+5:302017-06-20T07:17:48+5:30

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने केलेल्या शिफारशींना यंदा प्रशासनाने सोईस्कररीत्या कोलदांडा घातल्याचे दिसून येत आहे

Criminal investigation | चौकशी समितीच्या शिफारशींना कोलदांडा

चौकशी समितीच्या शिफारशींना कोलदांडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने केलेल्या शिफारशींना यंदा प्रशासनाने सोईस्कररीत्या कोलदांडा घातल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने दिंडीप्रमुखांच्या सन्मानार्थ भेटवस्तू देण्याऐवजी पालखीसोहळ्यात सेवासुविधा पुरवाव्यात, कार्यक्रमांचे नियोजन करावे, वेळापत्रक करावे या शिफारशीकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी सोईस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
पालिकेतर्फे गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसने विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावर भाजपने जोरदार आवाज उठविला होता. मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे अशी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. ४५ पानांचा अहवाल समितीने सादर केला. त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा देऊन निविदाप्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. एकाच ठेकेदाराने वेगवेगळ्या नावांनी अधिक निविदा भरल्याचे निदर्शनास आले होते. जनतेच्या भावनांशी निगडित गोष्टींमध्ये काळजी घ्यावी, अशी सूचना केली होती. समितीने असे प्रसंग उद्भवू नये, म्हणून काही शिफारशीही केल्या होत्या. प्रचलित पद्धतीने दर वर्षी ज्या बाबी करायच्या आहेत, त्यासाठी वेळापत्रक करावे, त्या अनुषंगाने निविदा प्रसिद्ध करावी. तसेच दिंडीप्रमुखांना सन्मानार्थ भेटवस्तूंऐवजी पालखीसोहळ्यात सेवासुविधा पुरविण्यात याव्यात, या शिफारशी समितीने केल्या होत्या. मात्र, त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Criminal investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.