दहशत निर्माण करणारा मावळ पॅटर्न, किरकोळ कारणावरून हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:56 AM2018-12-23T00:56:32+5:302018-12-23T00:56:53+5:30
दहशत निर्माण करण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी मावळात आता मावळ पॅटर्न उदयास येत आहे.
पिंपरी : दहशत निर्माण करण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी मावळात आता मावळ पॅटर्न उदयास येत आहे. फ्लेक्सबाजीतून व सोशल मीडियावरील स्टेटसवरून आपले भडक अस्तित्व दाखवत व समाजात आपल्या भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी लहान लहान अल्पवयीन मुले गुंडगिरी व गुंडांचे फोटो वापरून दहशत निर्माण करीत आहेत. शिवाय किरकोळ कारणांवरून तरुण मुले वर्चस्व दाखवण्यासाठी हाणामारी व इतर घटना यांच्यात वाढ झाली आहे.
मावळ तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका आहे. मुबलक पाऊस त्यामुळे शेती जोमात आहे. तर पर्यटनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत स्थानिकांना मोठा रोजगार भेटत आहे. ग्रामीण भागातील तरुण वर्ग नोकरी पेक्षा व्यवसायावर जोर देत आहे. जमिनींचे भाव गगनाला भिडल्याने ज्यांनी जमिनी विकल्या त्यांनी बंगले बांधून दारात आलिशान चारचाकी वाहने ठेवली आहेत. मात्र शेतकरी म्हणून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तर अनेक जणांनी बापजाद्यांच्या जमिनी विकून चंगळ केली आणि आता ज्यांना जमिनी विकल्या त्यांच्याकडे माळी व इतर कामाला लागले आहेत. मावळातील ग्रामीण भागांमध्ये एके काळी मोठी वृक्ष संपदा होती़ मात्र आता खेडोपाडी झालेल्या मोठ मोठ्या फार्म हाऊस व बंगल्यात शोभिवंत झाडे दिसत आहेत. आणि डोंगर ओसाड झाले आहेत. फार्म हाऊस व बंगल्यांवर येणारे पाहुणे बिनदिक्कत शिकारी करीत असल्याने तसेच त्यांना गाववालेच साथ देत असल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. जागोजागी चायनीज सेंटरच्या नावाखाली अवैध दारू विक्री जोमात असून, या सर्वांत मावळातील तरुण वर्ग बुडाला असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. व्यसन व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चालू पिढी वाम मार्गाला लागली आहे.
कामशेत शहरात महामार्गाच्या पलीकडे असलेल्या एका कॉलनीत दोन दिवसांपूर्वी मुलीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. काही दुचाकी व चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या. सुमारे चाळीस ते पन्नास युवकांच्या गटात झालेल्या हाणामारीत स्थानिकांत मात्र दहशत निर्माण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी गाडीला कट मारला म्हणून वडगाव येथील वीस ते पंचवीस युवकांनी इंद्रायणी कॉलनीमध्ये प्रवेश करीत दोन गटांत लाठी काठ्यांनी हाणामारी केली. या वेळी बाजूने जाणाऱ्या एका बाईला अडवून तिच्या जाळनाच्या फाटीने एकमेकांना मारण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले. पोलिसांना फोन वर माहिती सांगितल्यानंतर ते आले. मात्र गुन्हा कोणावरही दाखल झाला नाही. तसेच एका तरुणाचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा करण्यात आला. तर एकाच्या वाढदिवसाला एकमेकांवर अंडी भेकून मारल्याने काही अंडी आजूबाजूच्या घरांवर बिल्डिंगवर पडल्याने दुसºया दिवशी त्यांना साफसफाई करावी लागली. याशिवाय या भागातून जाणाºया जुना मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी वाहनांमधून उतरणाºया व वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडील पैसे व मौल्यवान ऐवज चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
दिवसा ढवळ्या होताहेत चोºया
सोशल मीडियावर भाईगिरीचे स्टेटस टाकून आपल्या परिसरात काही टुकार तरुण दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळे मुली व महिलांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे भीतीदायक झाले असून, सकाळी मुलींना शाळा कॉलेजमध्ये सोडवण्यासाठी पालकांना जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी एक पालक महिला आपल्या मुलीला कॉलेजला सोडविण्यासाठी जात असताना दोन अज्ञात युवकांनी दुचाकीवरून येऊन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रसंगावधान दाखवल्याने चोरीची घटना टळली. अशा घटना वारंवार घडत असून, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र कोणतीच कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही.
महामार्गाच्या कडेला असलेल्या कॉलनी भागातील सुरुवातीच्या भागात अनेक युवक रात्रीच्या वेळी टोळक्याने जमत असून, तलवारीने केक कापणे, स्थानिक नागरिकांना दमबाजी करणे, मुली व महिलांची छेडछाड करणे आदी प्रकार घडत आहेत. यामुळे रात्र झाल्यानंतर महिला आणि मुली यांना घराच्या बाहेर निघणे अवघड झाले आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.