तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:44 IST2019-04-07T15:43:10+5:302019-04-07T15:44:21+5:30
लग्नाचे आमिष दाखवून लग्नास टाळाटाळ केल्याने तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबर प्रेमसंबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ करीत तरुणीला मानसिक त्रास दिल्याने तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली राजू गवळी (वय २५, रा. नढेनगर, काळेवाडी, मूळ-सबजेल चौक, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विराज गुलाब दराडे (रा. महापालिका शाळेमागे, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दराडे याने लग्नाचे आमिष दाखवून वैशालीसोबत प्रेमसंबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ करुन त्यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून वैशाली यांनी मंगळवारी (२ मार्च) सायंकाळी सात वाजता दराडे याच्या वाल्हेकरवाडी येथील घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैशाली यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विराज दराडे याच्यावर चिंचवड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.