तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लुटणारे आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:32 PM2019-04-24T18:32:26+5:302019-04-24T18:44:39+5:30
तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता
पिंपरी : तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लंपास करणारया आरोपींचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. दोन अल्पवयीन मुलांसह एकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिपक नवनाथ बन (वय १९, रा. संत तुकारामनगर, दुगार्माता कॉलनी, भोसरी) याला अटक केली असून त्याचा साथीदार तुषार चव्हाण (वय १९, रा. भोसरी) हा फरार आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १७ एप्रिलला शंभुलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय २९, रा. केशवनगर, कासारवाडी, भोसरी) हे दिघी परिसरातील पेवन कंपनीमध्ये डेली कलेक्शन करुन भोसरी-दिघी रोडवरुन दुचाकीने जात होते. दरम्यान, पाठीमागून दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी कलशेट्टी यांच्या दुचाकीला गाड्या आडव्या लावून त्यांच्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांच्याजवळील ८८ हजार ५०० रुपयांची रोकड घेवून पसार झाले.
दरम्यान, हा गुन्हा भोसरी परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २२ एप्रिलला दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व दुचाकी जप्त केली. दरम्यान, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिपक बन व तुषार चव्हाण यांचेसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
बन व चव्हाण या आरोपींची माहिती काढली असता ते गुजरात येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक गुजरात व ठाणे येथे रवाना झाले. दरम्यान, आरोपींना याबाबतची माहिती मिळाल्याने आरोपी गुजरातमधून पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असताना आरोपी दिपक बन हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घराच्या बाजूला सापळा रचला. त्यावेळी बन याला त्याच्या वडीलांच्या दुचाकीवरुन पळून जात असताना आळंदी येथे पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी ४९ हजार रुपयांची रोकड जप्त केली. दरम्यान, या गुन्ह्यातील तुषार चव्हाण याच्यासह इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरिक्षक उत्तम तांगडे, सहायक निरिक्षक गणेश पाटील, कर्मचारी महेंद्र तातळे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.