महाकाली टोळीतील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:58 PM2019-09-23T19:58:25+5:302019-09-23T19:59:05+5:30
दोन गंभीर गुन्ह्यात फरार असलेला महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
हिंजवडी : पिंपरी - चिंचवड शहरासह पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल पंधरा गुन्हे दाखल असलेला तसेच हडपसर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यामधील दोन गंभीर गुन्ह्यात फरार असलेला महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
सागर कुमार इंद्रा (वय २५, रा. यलवाडी, देहूगाव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून चार अग्निशस्त्रासह जिवंत काडतुसे, दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रा हा महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच हडपसरसह हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात तो फरार होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दीत गस्त घालत असताना फरार आरोपी हा घोटावडे गावाकडून हिंजवडीच्या दिशेने दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या सूचनेनुसार तत्काळ पोलिसांची दोन पथके तयार करून माण - गवारेवाडी रस्ता तसेच आयटीपार्क फेज तीनकडे जाणाºया रस्त्यावर साध्या वेषात तैनात करण्यात आली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून फेज तीनकडे जात असल्याचे पोलीस हवालदार आतिक शेख यांच्या लक्षात येताच पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता जवळील सॅकमध्ये दोन गावठी पिस्टल आणि दोन राउंड मिळून आले. तसेच सोमवारी (दि. २३) तो रहात असलेल्या यलवाडी देहू येथील घराची झडती घेतली असता आणखी दोन पिस्टल दोन राउंड जप्त करण्यात आले. असे एकूण चार पिस्टल, चार राउंड, एक दुचाकी असा एकूण एक लाख ५० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अजय जोगदंड निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे अनिरुद्ध गिजे, मीनिनाथ वरुडे, महेश वायबसे, पोलीस हवालदार किरण पवार, आतिक शेख, अमर राणे, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्यात आली आहे. मागील काही दिवसात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, तसेच चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. अट्टल गुन्हेगारांवर जरब बसवण्यात यश आले आहे.
- यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी