ताथवडेत अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 01:02 PM2019-10-09T13:02:24+5:302019-10-09T13:04:27+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई - बेंगळूरू महामार्गालगत नाकाबंदी करून गस्त घालण्यात येत आहे.
हिंजवडी : गावठी कट्टा तसेच जिवंत काडतुसासह एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. मुंबई- बेंगळूरु महामार्गाच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळणावर ताथवडे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. ७) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ महंमद शेख (वय २०, रा. कोयतेवस्ती, पुनावळे, मुळ गाव अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई - बेंगळूरू महामार्गालगत नाकाबंदी करून गस्त घालण्यात येत आहे. सोमवारी (दि. ७) रात्री नऊच्या सुमारास पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती मुंबई- बेंगळूरू महामार्गालगतच्या ताथवडे हद्दीतील एका हॉटेल समोर गावठी पिस्टल सहीत येणार आहे. शिंदे यांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे यांनी सदर ठिकाणी पथकासह सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अधिक चौकशी केली असता आरोपीवर यापूर्वी खुनाचा एक व खुनाचा प्रयत्न केल्याचा एक असे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.